जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. असुन शेतकरी सदाशिवराव मुळे (सर्वे नं. ५२३) यांच्या शेतात वीज कोसळून तीन जनावरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेत शेतकरी सदाशिवराव मुळे यांना धीर दिला.
पाहणीदरम्यान आमदार खोतकर यांनी संबंधित महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. “अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे,” यासाठी मी पाठपुरावा करुन लवकरच मदत मिळवून देणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, नायब तहसीलदार राजू निहाळ, सरपंच आबाजी गिराम, सखाराम गिराम,साळुराम गिराम, विष्णूपंत गिराम निवृत्ती मुळे ,वैद्यकीय अधिकारी, कृषी सहायक व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवकाळी पाऊस व वीज कोसळण्याच्या घटनांमुळे सध्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाने सतर्क राहून त्वरित मदत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.






